जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील वाटखळे येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखील संदिप घोलप, (वय २०, रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. निखिल घोलप हा १ ऑगस्ट रोजी हरवल्याची फिर्याद ओतूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, घोडेगाव येथील मावलया डोंगरावर सोमवारी (दि. १९) त्याचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी अभिषेक प्रकाश घोलप (वय.२३) व जितेंद्र पांडुरंग घोलप (वय. ३१, दोन्ही रा. वाटखळे, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोन आरोपीना ओतूर पोलीसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप खंड घोलप यांनी ओतूर पोलीस ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी मुलगा निखील घोलप हा १ ऑगस्ट पासून वाटखळे येथून हरवला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस हवालदार भारती आनंदा भवारी व पोलीस नाईक नदीम तडवी यांनी तपास सुरु केला.
घोडेगाव येथील मावलया डोंगरावर सोमवारी (दि.१९) त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी निखीलच्या खूनाचा शोध सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे हवालदार भारती भवारी व पोलिस नाईक नदीम तडवी यांनी अभिषेक घोलप, जितेंद्र घोलप या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी खूनाची कबूली दिली.
म्हणून केला खून
सुमारे ३ वर्षापासुन शेतजमिन वहीवाटीचे कारणावरून त्यांचे बरोबर भांडणे असुन सुमारे ५ महीन्यांपासुन त्यांचा मुलगा निखील घोलप हा सुद्धा त्याचे वडील संदिप घोलप यांचे प्रमाणेच शेतजमिन वहीवाटीचे कारणावरून आम्हाला तसेच आमच्या कुटुंबातील सर्वांना शिवीगाळ दमदाटी करून वारंवार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळुन आम्ही दोघांनी त्याला संपवायचे ठरवले.
दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील फळोदे गावचे हद्दित गार मावलाया नावाचे डोंगर उतारावरील रोडवर नेऊन निखीलच्या डोक्यावर, छातीवर दगडाने मारून खुन केला. त्यानंतर निखिलचा मृतदेह कोणाला दिसुन येवु नये म्हणुन रोडच्या खाली खोलवर खड्डयात टाकुन दिला, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.