अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी, (यवतमाळ) : केळापूर तालुक्यातील मंगी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ॠषिकांत किसन डाहूले (वय-35, रा. मंगी ता. केळापूर) या आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार द्रव दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. या प्रकरणात शासनातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी शासनाची बाजू मांडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगी येथील एक अल्पवयीन मुलगी २ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गावातील गोदरी कडे जात होती. त्यावेळी आरोपी ॠषिकांत डाहूले हा २ बैल घेऊन पिडीतेच्या पाठीमागे येत पिडीतेचा हात पकडून ‘तु माझे सोबत चलं’ असे म्हणून तिला गोठ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या अंगावरची ओढणी फेकून देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.
दरम्यान, अल्पवयीन पिडीतेच्या फिर्यादीवरुन आरोपी ॠषिकांत डाहूले याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी करून विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधिश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी शासनाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी ॠषिकांत डाहूले याला ३ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार द्रव दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी ४ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. शासनातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी शासनाची बाजू मांडली. तर आरोपी तर्फे ॲड. एस. पी. जैस्वाल यांनी काम पाहिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार अनिल बदखल, पोलिस हवालदार गुणवंत मडावी यांनी काम पाहिले.