कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २९ हजार किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ४७ लाख २० हजार रुपये किमतीचे गोमांस तसेच १२ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी (ता.१९) रात्री खडकी परिसरात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथून गाई व म्हशीचे गोमास घेऊन एक कंटेनर पुणे सोलापूर महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेव नगर, उरुळी कांचन, ता. हवेली) यांना मिळाली. तसेच हा कंटेनर भिगवणच्या पुढे निघाल्याची माहिती कांचन यांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी या संदर्भात दौंड पोलिसांशी संपर्क साधला. त्या माहितीच्या आधारे पोलीस गोरक्षकासह खडकी येथील आकांक्षा ढाब्याच्या परिसरात सदरचा कंटेनर उभा असल्याचे दिसून आले. दरम्यान, कंटेनर चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये गोमास असल्याची कबुली दिली.
यामध्ये २५ हजार किलो गायी व इतर प्राण्यांचे गोमास तर ४ हजार किलो म्हशीचे गोमास पोलिसांना आढळून आले. या गोमासची बाजारातील किंमत ४७ लाख २० हजार आहे. तर ताब्यात घेतलेल्या कंटेनरची किंमत १२ लाख असून एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.