मुंबई : कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच मुंबईतील सायन रुग्णालयात एका रुग्णासह त्याच्या महिला नातेवाईकाने महिला डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे सायन रुग्णालयात घडली. याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून सायन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास सायन रुग्णालयातील वॉर्ड नंबर तीनमध्ये ही घटना घडली. येथे कर्तव्य बजावत असलेल्या महिला डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रसाद नावाच्या एका रुग्णावर उपचार सुरू केले. रुग्णाच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. चेहऱ्याला ड्रेसिंग करत असताना प्रसादला वेदना होऊ लागल्या.
प्रसादने जोरात आरडाओरड करत उपचार करत असलेल्या महिला डॉक्टरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रसादच्या महिला नातेवाईकाने महिला डॉक्टरशी हुज्जत घातली. प्रसादवर उपचार करताना वापरलेला कापसाचा बोळा महिला नातेवाईकाने उचलून महिला डॉक्टरला लावत त्यांना मारहाण सुरू केली. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिला डॉक्टरच्या मदतीला अन्य डॉक्टर आणि कर्मचारी आल्यानंतर प्रसादसह नातेवाईकांनी रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर मारहाण झालेल्या महिला डॉक्टरसह वैद्यकीय अधिकारी यांनी सायन पोलीस ठाणे गाठून रुग्ण प्रसाद याच्यासह त्याच्या महिला नातेवाईकाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.