सिंदेवाही (चंद्रपूर): सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा उपवनक्षेत्रातील सावरगाटा घोट परिसरात दुर्मिळ गिधाड आढळून आला. गिधाड हा पक्षी या परिसरात दुर्मिळ झालेला होता. या परिसरात गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. गिधाड हा निसर्गाचा पर्यावरणपूरक पक्षी आहे. गिधाड मृत जनावरांच्या मांसावर आपली उपजीविका करीत असून, निसर्गाची साफसफाईचे काम करीत असतो. मात्र, कालांतराने जनावरांना देण्यात येणाऱ्या वेदनाशामक डायक्लोफेनाक, एसेक्लोफेनाक व केटोप्रोफेन सारख्या इंजेक्शनचा वापर वाढला. त्यानंतर मृत मांस खाल्ल्याने गिधाडच्या मूत्रपिंडावर परिणाम होऊन गिधाड या परिसरातून नामशेष झाला.
कालांतराने सरकारने यावर कायमची बंदी घातली. टीएटीआर तसेच पेंच येथे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हरियाणातून गिधाडाच्या २० जोड्या आणण्यात आल्या. या गिधाडांचे येथे संगोपन करून संवर्धन केले जात आहे. त्यामुळे या परिसरात आता गिधाडांचा अधिवास आढळून येत आहे. रविवारी सदर परिक्षेत्रात गिधाड आढळून आल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्याच बरोबर ब्रह्मपुरी वनविभागात दक्षिण ब्रह्मपुरी परिक्षेत्रात गिधाड आढळून आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सावरगाटा घोट परिसरात दुर्मिळ गिधाड आढळून आल्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वाखाली सदर गिधाडवर लक्ष ठेवून आहेत.