पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये फिरायला आलेल्या महिलांचे शौचालयात मोबाईलवर फोटो काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ५० वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास चंद्रकांत पवार (रा. जनता वसाहत, सिंहगड रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शेजारी राहणार्या एका ६० वर्षाच्या महिलेसह पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये फिरायला येत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी त्या गार्डनमध्ये फिरायला गेल्या होत्या. वॉशरुमसाठी त्या गार्डनमधील शौचालयात गेल्या असता विकास पवार या आरोपीने शौचालयाचे खिडकीतून डोकावून त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले.
विकास पवार हा फिर्यादीच्या ओळखीचा असून तो फोटो काढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तो त्या ठिकाणाहून पळून गेला. याबाबत पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.