पुणे: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यात जनसन्मान यात्रा काढली जात आहे. रविवारी ही यात्रा जुन्नर तालुक्यात आली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार दिलखुलासपणे बोलत होते. त्यांच्या काही मिश्कील टिप्पणीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. नारायणगाव जवळील १४ नंबर येथे आमदार अतुल बेनके मित्र मंडळाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अजित पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी अजित पवारांची अनघा साने या महिलेने मुलाखत घेतली. त्यावेळी अजितदादांनी मिश्कील टिप्पणी केली.
या यात्रेदरम्यान एका महिला प्रतिनिधीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, ‘तुम्ही गुलाबीच जॅकेट का घालता? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी हातात एक पुष्पगुच्छ घेत हा गुलाबी का? जॅकेटचा रंग गुलाबी ? असा प्रश्न करत गुलाबी रंग जरा खुलून दिसतो, म्हणून घालतो. उद्या महिलांनी सांगितलं की, नका घालू या कलरचे जॅकेट, काढा तर काढेन. पण हा कलर जांभळा आहे. जांभूळ खाल्ल्यानंतर बियांना जो कलर असतो, हा तो कलर आहे, असे उत्तर अजित पवार यांनी कलरच्या जॅकेटवर दिले. यानंतर पुन्हा अजित पवार म्हणाले, रक्षाबंधन कार्यक्रमात आलेल्या महिलांनी माझा हात धरला, ओढला खरं तर, माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यांदा माझा हात कधी ओढला नाही. तेवढ्यांदा या महिलांनी हात ओढला. पण, हे सगळं बहिणीच्या नात्याने घडलं, असं अजित पवार म्हणाले.
गुलाबी योजना चांगली, पण विरोधक न्यायालयात गेले
माझा जन्म काटेवाडीत झाला. नंतर आम्ही बारामतीमध्ये राहत होतो. आमच्या घरी गरीब महिला कामानिमित यायच्या. शेतात सुद्धा महिला काम करण्यासाठी यायच्या. महिलांना आवडीची गोष्ट घेता येत नाही, त्या स्वतःच्या आवडीला मुरड घालतात. लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. इतकी चांगली योजना आणली तर विरोधक न्यायालयात गेलेत. आम्ही आता दिले आणि पुढेही देणार आहोत. ४५ हजार कोटी वाटप करणार आहोत. इतके पैसे बाजारपेठेत येणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.