पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेला विद्युत वायरचा शॉक लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर साठलेल्या पाण्यात वायरचा करंट उतरला असल्याची माहिती मिळत आहे. पाण्यात पडलेल्या वायरचा अंदाज न आल्याने त्याचा झटका लागताच महिला मृत्युमुखी पडली. या महिलेची ओळख अजून पटलेली नसून नाव अद्याप समजू शकलेलं नाही. या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला होती. काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने कोंढवा भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला कामानिमीत्त घराच्या बाहेर पडली होती. मात्र, या परिसरात असलेल्या डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणाहून जात असताना पाण्यातील तारा महिलेला दिसल्या नाहीत. या तारांचा स्पर्श झाल्याने महिलेचा झटक्यात मृत्यू झाला.