आळंदी, (पुणे) : पुण्यातील डुडुळगाव परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात वेदश्री तपोवनचे दोन साधक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना सोमवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली आहे. ही मुले १२ ते १६ वर्षाच्या वयोगटातील आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, श्रावण पूजननिमित्त नदी पूजनासाठी हे सर्व विद्यार्थी इंद्रायणी नदीच्या डूडूळगाव येथील नदीकाठावर गेले होते. यावेळी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जाऊ लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याने नदीत उडी घेतली.
मात्र, त्याला एकाला वाचविण्यात यश आले, पण तो स्वतःच यामध्ये बुडाला. हे विद्यार्थी घाबरलेले असून निश्चित किती जण बुडाले याचा आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र, दोन विद्यार्थी बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर यात आहे.
दरम्यान, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, दिघी पोलीस स्टेशन आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या सहाय्याने दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. अद्याप दोन्ही मुलांबाबत शोध लागला नाही. नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली आहे.