दीपक खिलारे
इंदापूर : मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे काढले नाहीत, तर तुम्ही फार काळ खुर्चीवर रहाणार नाहीत, असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत या मागणीसाठी राणे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१८) हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी इंदापूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
राणे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या घराण्याच्या आद्यपुरुषाच्या गढीवर जर अतिक्रमण होत असेल, त्यांचा अवमान होत असेल तर अशा गोष्टींना विरोध केला नाही, तर आम्हाला महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न मनात घेवून आपण येथे आलो आहे. कोणत्या पक्षाचा आमदार वा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. स्वतःसाठी अथवा राजकारण करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले.
मुसलमान हिंदूंचे शत्रु नाहीत, हिंदूच हिंदूंचे शत्रु आहेत म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही नितेश राणेला नव्हे तर भगव्याला विरोध करता आहात. मी काही व्हाईट कॉलर आमदार नाही. जेथे जातो तेथे तयारीनेच जातो. दोन चार जणांना झोपवूनच घरी जायचे त्यांचातला मी आहे. बरे झाले पोलीस आमच्या गाड्या तपासत नाहीत. विरोध करणाऱ्यांच्या डोक्यावर जेवढे केसेस नसतील तेवढ्या ३०७, ३५३ च्या केसेस माझ्यावर आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.