दौंड : दौंड तालुक्यातील जलसंपदा विभाग व ऊर्जा विभागाशी संबंधित तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्यांबाबत उद्या १९ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या अनेक मागण्या जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. यामध्ये खडकवासला धरण ते फुरसुंगी, लोणी काळभोर पर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी, मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळविण्याबाबत आलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून याबाबत धोरण निश्चित करणे, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता व मंत्रिमंडळ मान्यता मिळावी.
तसेच राज्यातील चिबड खारवट व पाणथळ शेतजमीन निर्मूलन करण्यासाठी सुधारित धोरण निश्चित करून याबाबत दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देण्याबाबत, दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविणे, यवत येथील जलसंपदा विभागाची असणारी जागा यवत पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत बांधकामे करता हस्तांतरित होण्यासाठी मान्यता मिळावी व तालुक्यातील महावितरणच्या असणाऱ्या अनेक विविध मागण्यांबाबत ही बैठक होणार आहे.
दौंड तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी ही अतिशय महत्त्वाची बैठक असून यामधून सकारात्मक निर्णय होऊन तालुक्याच्या पाणी आणि विजेबाबत निश्चितच मार्ग निघणार असल्याचे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपले, समिती प्रमुख श्री. अविनाश सुर्वे, जलसंपदा विभाग, पुण्याचे मुख्य अभियंता, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांच्यासह जलसंपदा व ऊर्जा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.