बापू मुळीक
सासवड : शिक्षणातून चार “म” चा विकास व्हावा असं महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. मन, मस्तिष्क मनगट व मानवता. सध्य कालीन शिक्षणातून हे होणे अपेक्षित आहे. या उद्देशांची पूर्तता होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. राजेवाडी या केंद्रात सर्व शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या समन्वयाने हे उद्दिष्ट पूर्तीसाठी काम करण्याचे ठरले.
लेखन, वाचन, गणन या अपेक्षित क्रिया पूर्ततेसाठी मनाचा विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी राजेवाडी केंद्रात आठवड्यातील एक दिवस निवडला. सर्व शाळांनी आपल्या स्तरावर आणापानक्रिया, योगासने व प्राणायाम घेण्याचे ठरले. ऑक्टोबर 2023 पासून राजेवाडी केंद्रामध्ये हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमाचा फायदा काय?
मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढली. वर्गामध्ये शिक्षक नसतानाही स्वयंअध्ययन विद्यार्थी करू लागले. कृती घेतली असल्यास विद्यार्थ्यांची समज चांगल्या पद्धतीने वाढते हे लक्षात आले. पारंपारिक आट्यापाट्या, सुरपाट्या, मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, खो-खो, गोळा फेक या खेळांचा सराव व्हावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन खेळ निवडण्याची संधी देण्यात आली.
ज्या विद्यार्थ्याला ज्या खेळात आवड आहे, असे दोन खेळ निवडले. आठवड्यातील खेळांच्या तासाला किंवा संधी मिळेल तेव्हा त्याने निवडलेलेच खेळ खेळायचे असे ठरवले. राजेवाडी केंद्रातील शिक्षकांनी परदेशातील शिक्षण पद्धती कृती आधारित अभ्यास केला. विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणितासारखा विषय खेळातून गणित कसे शिकायचे या कृती शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
संगीतमय पाढे व पाढ्यांचा उपयोग, लहान मोठेपणा, उंच छोटा, सम विषम संख्या, पाढ्यातील संख्या, त्रिकोणी संख्या यासारखे घटक मैदानावर खेळातून शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाची आवड निर्माण झाली, व त्यातून वनस्पतीचे ज्ञान या घटकाचाही अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला. स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचे यश मिळवले.