-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याचे विशेष ज्ञान व दिर्घ अनुभव लक्षात घेता नागपूर येथील प्रसिद्ध वकील ॲड. अक्षय नाईक, ॲड. देवेंद्र चव्हाण, ॲड. मोहन सुदामे व ॲड. फिरदौस मिर्झा आदींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला आहे. वरिष्ठ वकीलाचा दर्जा 18 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी 2 ऑगस्ट 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली.
नागपूर येथील ॲड. अक्षय नाईक यांना वकीली व्यवसायात 25 वर्षांचा दिर्घ अनुभव आहे. ॲड. अक्षय नाईक हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांचे पुत्र आहे. ॲड. अक्षय नाईक यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर सन 1999 पासून आईसह महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता व वरिष्ठ वकील ॲड. व्ही. आर. मनोहर, राज्याचे माजी महाधिवक्ता व वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. शशांक मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वकीली व्यवसायाला सुरुवात केली. ॲड. अक्षय नाईक हे फौजदारी, दिवाणी व इतर सर्व प्रकारच्या कायद्याशी संबंधित प्रकरणे हाताळतात. ॲड. अक्षय नाईक यांनी इतर विविध प्रकारच्या जनहित याचिकेचेंही कामकाज पाहिले आहे.
ॲड. देवेंद्र चव्हाण हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील आहे. चव्हाण हे वकीली या पदावर कार्यरत असतांना वरिष्ठ अधिवक्ता हा दर्जा मिळालेले ते पहीलेच वकील आहे. ॲड. देवेंद्र चव्हाण हे 24 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वकीली करत आहे. त्यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ वकील ॲड. सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वकीली व्यवसाय सुरू केले. त्यांना राज्यघटना, प्रशासकीय कायदे, फौजदारी कायदे व कंपनी कायदे यासह विविध कायद्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये वकीली व्यवसायाचा अनुभव आहे.
ॲड. मोहन सुदामे हे गेल्या 38 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली व्यवसाय करीत आहे. कायद्याची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी 1986 ते 1992 या काळात राज्याचे महाधिवक्ता व वरिष्ठ वकील ॲड. श्रीहरी अणे यांच्या मार्गदर्शनाखाली वकीली व्यवसाय सुरू केली. त्यांना राज्यघटना, प्रशासकीय कायदे, कामगार कायदे यासह इतर अनेक कायद्यांचे सखोल ज्ञान आहे. त्यांचा विविध शासकीय प्राधिकरणाच्या पॅनल मध्ये समावेश आहे.
ॲड. फिरदौस मिर्झा सन 1995 पासून वकीली व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचे वडील ॲड. तसलीम मीर्झा हे यवतमाळचे प्रसिद्ध वकील आहे. ॲड. तसलीम मीर्झा हेच ॲड. फिरदौस मिर्झा यांचे गुरू आहे. त्यांनी वडील ॲड. तसलीम मीर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली वकीली व्यवसायात पदार्पण केले. यवतमाळात वकीली करत असतांना नंतर ते नागपूर येथे स्थायिक झाले. तेथे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली व्यवसाय सुरू केली. त्यांनी 29 वर्षाच्या कार्यकाळात असंख्य अशा प्रकरणात युक्तिवाद केला. तसेच आदिवासी भुखबळी, रोड वरील धार्मिक अतिक्रमणे, अन्न व शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था इत्यादी ज्वलंत विषयांवरील जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ॲड. फिरदौस मिर्झा यांना अनेक जनहित याचिका मध्ये त्यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.