उरुळी कांचन, (पुणे) : पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याच्या हेतूने टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील एका तरुणावर कटरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चौकात शनिवारी (ता. 17) रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन येथील एका 20 वर्षीय तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य कांबळे (रा. गॅस गोडाउन जवळ आश्रमरोड उरूळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम बलभिम सुर्यवंशी (वय – 20, रा. टिळेकरवाडी ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कांबळे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य कांबळे व शुभम सुर्यवंशी यांच्यात मागील काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. शनिवारी संध्याकाळी शुभम घरी असताना कांबळे याने शुभम याला घराच्या जवळ असलेल्या चौकात बोलावून घेतले होते. यावेळी बोलत बोलत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. व तु पोरीच्या मागे का फिरतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने हातावर, बरगडीवर, दंडावर कटरने वार करून जखमी केले.
याप्रकरणी शुभम सुर्यवंशी याने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहे.