राज्यात सद्या सगळीकडे लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु दुसरीकडे लाडकी बहीण योजना बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अकाऊंटमध्ये पैसे आल्यानंतर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये एकच गर्दी केली आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचारी वैतागले असून संताप व्यक्त करत आहेत. या मोठ्या गर्दीमुळे बँकेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. यासंदर्भात त्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेनंतर बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच विविध योजनांसाठी इतर लोकांची गर्दी होत असल्यामुळे बँकेतल्या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. काही वेळा अनेक जण बँक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर जात आहेत. आपले काम होत नसल्यामुळे ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्यांवरच संताप व्यक्त करत आहेत. अनेकदा वाद देखील होताना दिसून येत आहे.
बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणी करणारे पत्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. बँक फोरमचे देविदास तुळजापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात थेट पत्र पाठवल्याची माहिती मिळत आहे.