पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मेफेड्रोनच्या विक्रीस पाठविणाऱ्या गुजरातमधील एका बड्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. तस्कराने पुण्यासह देशातील वेगवेगळ्या भागात मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात उघडक झाले आहे. मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्माईल मर्चंट (रा. जंबुसर, जि.भरूच, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील लोहगाव भागात एका सदनिकेत मेफेड्रोनचा साठा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून १ कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित बेंडे, निमीष आबनावे यांना अटक करण्यात आली.
आरोपींनी कुरिअरमार्फत मेफेड्रोन घरपोहोच दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुरिअर कंपनीतील कर्मचारी विश्वनाथ कोनापुरे (सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) याला अटक केली.
दरम्यान, या मेफेड्रोन विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निमीष आबनावे असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आबनावेची चौकशी केली असता गुजरातमधील मेफेड्रोन तस्कर मोहम्मद मर्चंट याने अमली पदार्थ विक्रीस दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक गुजरात भरुच येथे गेले. सापळा लावून मर्चंट याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली.