मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. त्यानुसार, आता पुन्हा एकदा कारवाई करत महाराष्ट्रातील आघाडीची बँक अशी ओळख असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला दणका दिला आहे. बँकेने नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने महाराष्ट्र बँकेला तब्बल 1,27,20,000 चा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने कर्ज प्रणाली ‘ऑफर डिलिव्हरी ऑफ बँक क्रेडिट’, ‘सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट’ आणि KYC बाबत जारी केलेल्या नियमांचे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने बँकिंग नियमन 1949 अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला हा मोठा दंड ठोठावला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तसेच मे 2023 पर्यंत बँकेच्या आयटी विभागाचीही तपासणी करण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
महाराष्ट्र बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले होते. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावून बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली आहे. काही कर्जदारांच्या बाबतीत, मंजूर निधी खेळत्या भांडवलाच्या मर्यादेनुसार पूर्ण केला गेला की नाही, याची खात्री करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे.
याशिवाय, ‘युनिक कस्टमर आयडेंटिटी कोड’ जारी करण्याऐवजी, बँकेने ग्राहकांना एकाधिक ‘कस्टमर आयडेंटिटी कोड’ जारी केले आहेत. बँकेने नियामक आवश्यकतांची पूर्तता न करणाऱ्या काही खात्यांमध्ये ऑपरेशनला परवानगी दिली. नियामकांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.