मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलिंडर’, तर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाला क्रिकेटची ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड राज्यातील विविध प्रादेशिक पक्षांच्या निवडणूक चिन्हाबाबतची घोषणा केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढावे लागले होते. पक्षाचे नेते खुद्द प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात ‘प्रेशर कुकर’ चिन्ह मिळाले होते. त्यामुळे आंबेडकर यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन विधानसभा निवडणुकीला ‘गॅस सिलिंडर’ हे निवडणूक चिन्ह देण्याची विनंती केली होती. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने वंचितला मोठा दिलासा मिळाला आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने लोकसभा निवडणूक ‘शिट्टी’ या चिन्हावर लढवली होती. आता या पक्षाला क्रिकेटची ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सध्याच्या विधानसभेत प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते.