अक्षय टेमगिरे
शिक्रापूर, (पुणे) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हर्फुल इंडॉस्पेस लॉजिस्टिक या कंपनीचे वेअर हाऊस फोडून मालाची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या शिक्रापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी तांब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल 37 लाख 14 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी बाळू रघुनाथ गायकवाड, संभाजी शिवाजी भोसले, (रा. दोघेही दरोडी, ता. पारनेर जि. नगर), मयूर विलास सरोदे, (रा. सरदवाडी, ता. शिरुर), जावेद उर्फ गौसे अजम नजिर शेख, (रा. हुडको शिरुर, ता. शिरूर), रमेश रामभाऊ खराडे (रा. कामाठीपुरा ता. शिरुर), मुज्जफर रमजान शेख (वय (29), सलीम मुनीर शेख (वय -28), दिपक रामदास मस्कुले, (वय- 32, रा. सर्वजण दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमधील व्हर्फुल इंडॉस्पेस लॉजिस्टिक पार्क मधील बी 800 व्हर्फुल कंपनीचे वेअर हाऊस मधील रचना स्पीड लॉजिस्टिक गोडाऊन मधून मायक्रो ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर, असा अंदाजे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल कंपनीचे वेअर हाऊस फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक संदीप नारायण पवार राहणार (शिरूर ग्रीन सिटी, गोले गाव रोड, ता. शिरूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना तपास पथकातील पोलिसांनी बाळू गायकवाड, मयूर सरोदे व त्याच्या काही साथीदारांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा आणखी साथीदारांनसमवेत केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार दरोडी येथील मुज्जफर शेख, सलीम शेख, दिपक मस्कुले, यांना अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून विविध ठिकाणावरून व्हर्फुल कंपनीचे 71 एसी, 19 डबल डोअर रेफ्रिजरेटर, 16 वॉशिंग मशिन, 18 डिश वॉशर, 85 मायक्रो ओवन, 09 सिंगल डोअर रेफ्रिजरेटर, 6 ईलेक्ट्रिक शेगडी असा एकूण 37 लाख 14 हजार 220 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजिने, उमेश कुतवळ, विलास आंबेकर, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.