पिंपरी: कारचालकाने मालकाला गुंगीचे औषध देऊन घरातील ६ लाख ४१ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. १४) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान थेरगावातील स्विस काऊंटी सोसायटीत घडली. याबाबत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रफिक ऊर्फ समीर जमादार (वय ४२, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मधुमेह आणि रक्तदाबाचे औषध देताना त्यामधून गुंगीचे औषध फिर्यादी यांना दिले. फिर्यादी यांना गुंगी आल्यावर आरोपीने फिर्यादी यांच्या हातातील साडेतीन लाखांचे ब्रेसलेट, एक लाख ८० हजारांची चैन, एक लाख रुपयांचा चैनीतील डायमंडचा गणपती, सहा हजार रुपयांची पाकिटातील रोख रक्कम, पाच हजार रुपयांची कारची चावी, गाडीचे आरसी बुक, बँकेचे क्रेडिट कार्ड असा एकूण सहा लाख ४१ हजारांचा ऐवज चोरून करून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.