पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच १२४वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचा १२५वा पदवीप्रदान समारंभ नोव्हेंबर/डिसेंबर २०२४ मध्ये होणे अपेक्षित आहे. या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून, पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे करण्यात येत आहे.
फक्त एप्रिल-मे २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी ३१ ऑगस्टपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. तर, १ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. एप्रिल-मे २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.