विजय लोखंडे
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील वाघेश्वर मंदीर ते भावडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे आठ कोटी रुपये निधी खर्च करून बनविण्यात आला आहे. मात्र, सिमेंट काँक्रीटचा रस्ता खडी वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे रस्ता उखडून रस्त्याला मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यासाठी शासनाने खर्च केलेला निधी पाण्यात गेल्याचा स्थानिक नागरीकांची चर्चा असल्याचे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील यांनी सांगितले.
वाघेश्वर मंदीर ते भावडी रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वाघोली व परिसरामध्ये पर्यावरण विस्कळीत झाले आहे. दिवसा ढवळ्या अवैध रित्या चाललेला हा व्यवसाय व यापासून पर्यावरण तसेच नागरिकांना होणारा त्रास विचार करण्याच्या पलीकडचा आहे. धूळ प्रदूषणामुळे पर्यावरण दूषित होऊन अनेक लोकांना दम्याचा त्रास असून नागरीक त्रस्त आहेत.
ज्या ठेकेदाराने रस्ता बनविला त्याच्याकडून रस्त्याची डागडूजी होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. तसेच वाघोली भावडी खान क्रेशर संघटनेकडून रस्ता डागडुजी दुरुस्तीचे काम होणे अपेक्षीत आहे. त्यांनी त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लोणीकंदमधील खान क्रेशर वाहतूक ही सुरभी हॉटेल रोड बायपास नगररोड होणे गरजेचे आहे. तरच वाघोली भावडी रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन रस्त्याची परिस्थिती व्यवस्थित राहील. यावर तातडीने संबंधितांनी कारवाई करण्याचे गरजेचे आहे. शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच भावडी रोड कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील यांनी दिला दिला आहे.