भंडारा : भंडाऱ्यातून एक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील देव्हाडी-तुमसर राज्य महामार्गावर शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. एका मुजोर मद्यधुंद कारचालकाने सायकलवरून घरी परत निघालेल्या २ मजुरांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की सायकलवर बसलेले १० ते १५ फूट दूर जाऊन कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, अपघातात एका मजुराला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. मनोज परसगडे (४०) रा. माकडे नगर तुमसर असे अपघातातील जखमी मजुराचे नाव आहे. मनोज हा देव्हाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो. सायंकाळी तुमसर येथे घरी जाण्याकरिता मनोज व त्याच्या एक मित्र सायकलने निघाले होते.
देव्हाडी तुमसर या राज्य महामार्गावरील मोर केमिकल जवळ एका भरधाव स्विफ्ट कारने मनोज याच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारची धडक बसताच मनोज हा पुलाच्या कठड्याला जाऊन धडकला. तर त्याच्या दुसरा मित्र बाजूला फेकला गेला. कठडा व कारचे लोखंडी भाग मनोजच्या डोक्याला व डाव्या पायाला लागले, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. विनोबा भावे असे फरार झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
पाठीमागून जाणाऱ्या काही प्रवाशांनी जखमी मनोजला रस्त्याच्या बाजूला नेऊन, या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना देण्यात आली. जखमीला रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले.