योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. जुगाराच्या साहित्यासह काही रक्कम जप्त करत संतोष सर्जेराव पटेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी ता. शिरुर येथील दोस्ती बारच्या शेजारी एक इसम नागरिकांना चिठ्ठ्या देऊन जुगार खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर सहाय्यक पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, प्रतिक जगताप यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. एक इसम नागरिकांकडून पैसे घेत कागदाच्या तक्त्यावर चिटकवलेली चिठ्ठी देऊन जुगार खेळवत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान पोलिसांनी त्याला जागेवर पकडत त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली. याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष सर्जेराव पटेकर सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आझाद कॉलेज समोर गीतानगर जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.