मुंबई : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने तब्बल दीड महिन्यानंतर प्रसिद्ध केली. भुमरे यांच्याकडील खाती मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे नमूद केले आहे.
शिवसेनेचे खासदार भामरे हे औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. भुमरे यांनी २७ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. राज्यपालांनी राजीनामा तत्काळ स्वीकारला.
भुमरे यांच्याकडील दोन्ही खाती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केली आहे. त्यामुळे भुमरे यांनी राजीनामा २७ जूनला दिला असताना, अधिसूचना काढण्यास विलंब का लागला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.