उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील दिपक हार्डवेअरचे मालक निखिल पंजवाणी (वय-२५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) रात्री सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. निखिल पंजवाणी यांच्या आत्महत्येला २४ तास उलटूनही आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांचा तपास सुरु आहे.
याप्रकरणी निखिलचा भाऊ यश शंकर पंजवाणी (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल पंजवाणी यांचे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या समोर दीपक हार्डवेअर नावाने दुकान आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजले तरी, निखील घराबाहेर आला नाही. म्हणून त्याचा भाऊ यश शंकर पंजवाणी याने दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. यश याने नागरिकांच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला व घरात जाऊन पहिले असता, निखिलने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आहे.
निखिलला तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी निखिलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी निखिलचा भाऊ यश पंजवाणी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी निखिलच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून केली आहे. निखिल पंजवाणी याने आत्महत्या का केली याचे कारण २४ तास उलटूनही अद्याप अस्पष्ट आहे. तरी पुढील तपास पोलीस अंमलदार रमेश गायकवाड करीत आहेत.