संतोष पवार
पळसदेव : पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात देशसेवा केलेल्या माजी सैनिक, विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडु यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विद्यालयात पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रभातफेरी, सामुदायिक कवायत, स्काऊट गाईड संचलन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील इयत्ता १ली ते १२वी पर्यतचे प्रथम तीन क्रमांक, शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी, सारथी शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी मल्ल अहिल्या शिंदे, राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू हरीश डोंबाळे, धनुर्विद्या आर्चरी राज्यस्तरीय स्पर्धेतील सिलव्हर मेडल प्राप्त खेळाडु अविष्कार शिंदे, राज्यस्तरीय धावपटू बालाजी अडवाल या खेळाडुंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच कालवा निरीक्षक व अन्न -पुरवठा निरीक्षक पदी निवड झालेली विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अश्विनी वायसे, राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेला विद्यार्थी विनोद भोसले यांचाही गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या आर्टिस्ट पदवीचे शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थीनी वैष्णवी पवार हीने स्वतः रेखाटलेल्या प्राचीन पळसनाथाच्या मंदिराची चित्राकृती विद्यालयास भेट म्हणून दिली.
शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रकाशभाऊ काळे यांच्या स्मरणार्थ विद्यमान अध्यक्ष भूषण काळे, राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, केशर मल्हार शिष्यवृत्ती, मातोश्री शिष्यवृत्ती, पंडित पोतदार फाउंडेशन, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब गांधले, सेवानिवृत्त डीवायएसपी जगन्नाथ काळे, विजयकुमार काळे, प्रकाश भोसले, अमिन मुल्ला, हिराजी काळे, पै. हिराचंद काळे, माजी विद्यार्थी संघ आदि बक्षीस दात्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि सुमारे ३० हजार रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस, शालेय साहित्य यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.