शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील व्हर्लपूल वेअर हाऊसमधील तब्बल २२ लाखांचे फ्रीज आठ जणांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोडावूनचे व्यवस्थापक संदीप नारायण पवार (वय- ३८ वर्षे रा. ग्रीन सिटी गोलेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मयूर विलास सरोदे, संभाजी शिवाजी भोसले, दीपक रामदास मसकुले, सलीम मुनीर शेख, मुजफ्फर रमजान शेख, रमेश रामभाऊ खराडे, जावेद बशीर शेख व बाळू रघुनाथ गायकवाड अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी येथील इंडोस्पेक लॉजिस्टिक पार्क येथे व्हर्लपूल कंपन्यांचे फ्रीज ठेवण्यासाठी व्हर्लपूल वेअर हाऊस आहे. येथे व्हर्लपूल कंपनीच्या फ्रीजसह इतर इलेक्ट्रिक साहित्य ठेवले जाते. या गोडावूनचे व्यवस्थापक संदीप पवार हे सर्व साहित्य तपासात असताना त्यांना काही फ्रीज कमी आहेत असे निदर्शनास आले.
दरम्यान, तेव्हा संदीप पवार यांनी सुरक्षारक्षक मयूर सरोदे व बाळासाहेब गायकवाड यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी, त्यांनी त्यांचे साथीदार संभाजी भोसले, दिपक मसकुले, सलीम शेख, मुजफ्फर शेख, रमेश खराडे व जावेद शेख यांच्या साह्याने चोरी केली असे सांगितले. संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.