यवत : दौंड नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांच्याबाबत नुकतीच आमदार राहुल कुल यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. दौंड शहरातील व नगरपालिका हद्दीतील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार यांसह माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने अमृत 2 या योजनेमध्ये दौंड नगरपालिकेचा समवेश झाला आहे. या योजनेतून पाणी पुरवठा योजनेचा पुढील 50 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करुन 25 कोटी रुपयांचा समग्र आराखडा (DPR) तातडीने तयार करावा , प्रलंबित असलेले बुद्धविहारचे काम ठेकेदारांना सूचना करून तातडीने पूर्ण करावे आवश्यक असल्यास वाढीव निधीसाठी अंदाजपत्रक करून त्याला शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, नगरोत्थान योजना अंतर्गत उर्वरित निधीतून पाणीपुरवठ्याची अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी (WTP) बांधण्यात आलेली 18 लाख लीटरच्या पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकीतून पाणी पुरवठा चालू करावा. तसेच छत्रपती श्री. शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या बस स्टॅडला नळपाणी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात यावी.
मंजूर असलेले कॅनॉल रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, आदि विकास कामे तातडीने पूर्ण करावे अशा सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.