नवी मुंबई: कोपरखैरणे भागात राहणाऱ्या प्रमोद गौतम (२८) याने निधी (२१) या तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू केले. निधीचा अशा प्रकारे प्रेमभंग झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी निधीने प्रियकर प्रमोद गौतमला ओढणी व पंख्याचा फोटो पाठवल्याचे देखील उघडकीस आले आहे. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी प्रमोद गौतमविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील मृत निधी ही तरुणी कोपरखैरणेमध्ये आई-वडील व भावासह राहत होती. मृत तरुणीचे कुटुंब मागील वर्षभरापासून कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होते. यादरम्यान तेथील डॉक्टरकडे येणारा त्याचा मित्र प्रमोद गौतमने निधीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून निधीसोबत शरीरसंबंधदेखील प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर प्रमोद गौतमने निधीला टाळण्यास व तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आपल्यासोबत दुसरे कोणी लग्न करणार नाही, या विचाराने निधी मानसिक तणावाखाली आली होती.
याच तणावातून १८ जुलै रोजी निधीने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला असता, प्रमोद गौतमने निधीसोबत प्रेमाचे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचे व त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवून निधीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आढळले. त्यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी मृत निधीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रमोद गौतमविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
निधीच्या मोबाईल फोनमधील फोटो व व्हिडीओ पोलिसांनी घेतले ताब्यात
निधीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन्ही मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली असता, त्यातील एका फाईलमध्ये निधीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्याचे फोटो तसेच मंगळसूत्रात इंग्रजी अक्षरात निधी व प्रमोद या दोघांच्या नावाचे पेंडंट आढळले. तसेच तिच्या मोबाईल फोनमध्ये प्रमोद गौतमसोबत एकांतातील अनेक फोटो व व्हिडीओदेखील आढळले. प्रमोद गौतमने त्याचा एका दुसऱ्या मुलीसोबतचा एक व्हिडीओदेखील निधीला पाठवल्याचे आढळले. पोलिसांनी हे सर्व फोटो व व्हिडीओ तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.
निधीने ओढणी व पंख्याचा फोटो पाठवून आत्महत्या केल्याचे उघड
आत्महत्या करण्यापूर्वी निधी व प्रमोद गौतममध्ये ३४ मिनिटे व ३४ सेकंद व्हॉट्सॲप कॉलवरून बोलणे झाल्याचे आढळले. त्यानंतर निधीने आत्महत्या करण्यापूर्वी रात्री १२.३० वाजता गळफास घेण्यासाठी वापरलेली ओढणी व पंख्याचा फोटो प्रमोद गौतमला व्हॉट्सॲपद्वारे पाठवले होते. तसेच गुडबाय, टेक केअर, लव्ह यू, मिस यू, तसेच हा माझा शेवटचा व्हॉईस कॉल असल्याचा मेसेजदेखील पाठवला होता. यावरून निधी आत्महत्या करत असल्याची माहिती असतानासुद्धा प्रमोद गौतमने तिला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे आढळले.