मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावरून चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेंचा त्याला पाठींबा असेल.”अस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यात बोलताना म्हणाले.
आज महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांचा मेळावा पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही 30 शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचाच मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. माझं तर म्हणणं आहे आजच महाराष्ट्राचीही निवडणूक जाहीर करुन टाका. निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. बोलणं सोपं आहे पण लढाई कठीण आहे. लोकसभेला राजकीय शत्रूंना पाणी पाजलं, ती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आता विधानसभेला महाराष्ट्र धर्मरक्षण, अस्मिता, स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ते महाराष्ट्र लुटायला आलेत. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने लढायला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. फक्त हे आपल्या तिघा मित्रपक्षात व्हायला नको. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि आमच्यात आपसात तू राहशील की मी, असं नको व्हायला, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरे यांनी केली.