करमाळा : सोलापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली असून जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या जागी यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोंडीबा धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे. संजय माळी यांना अद्याप कुठलाच पदभार दिला नाही.
याबाबत वृत्त असे की, करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्यामुळे रस्त्याची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची झाली, शासनाच्या नियम व अटी मध्ये अधीन न राहता मर्जीतल्या ठेकेदारांकडून पैसे घेऊन त्यांना कामे दिली असे व यासारखे अनेक आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी सार्वजनिक अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्यावर केले होते. शिवाय संजय माळी यांच्या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या एका कार्यकर्त्याला प्रति संजय माळी तयार करून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते व गळ्यामध्ये नोटांची माळ घातली होती. ‘मला पैशाची प्रचंड भूक, मला भ्रष्टाचार करायला खूप आवडतो’ अशी पाटी त्यांच्या हातात दिली होती. शिवाय गांधीगिरी मार्गाने त्याच ठिकाणी रक्तदान आंदोलन केले होते. यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान आंदोलन करून शांत न राहता अतुल खूपसे-पाटील यांनी यासंबंधी बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. दरम्यान अशा वादग्रस्त ठरलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाल्याने जनशक्ती शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी आनंद व्यक्त केला.
भगवान के घर में देर है, अंधेर नही
– करमाळा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये सुरू असलेले रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरू आहेत. या ठेकेदारांकडून टक्केवारी घेत लाचखोर व भ्रष्ट अधिकारी संजय माळी यांनी अमाप पैसा कमवला. शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत मर्जीतील ठेकेदारांकडून पैसे घेत कामे दिली. त्यामुळे इंजिनीयर झालेले शेकडो युवक बेरोजगार झाले. म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नही या म्हणीनुसार आम्हाला पहिले यश आले आहे. लवकरच त्यांची चौकशी व्हावी यासाठी मी आग्रही आहे.
– अतुल खूपसे-पाटील, जनशक्ती शेतकरी संघटना