मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या ३५ लाख ‘बहिणीं’चे आधारकार्ड बँक खात्याशी जोडले गेले नसल्याची बाब मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडली गेली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व अर्जांची तातडीने प्रतिपूर्ती करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
गणेशोत्सव तोंडावर आल्याने महिला वर्गाकडून या योजनेत अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. राज्यातून सुमारे १ कोटी ३५ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. येत्या १७ ऑगस्ट रोजी पुण्यात लाभार्थी बहिणींना लाभ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अर्जासोबत आधारकार्ड आणि शिधापत्रिका जोडणे बंधनकारक आहे. मात्र, अर्जदारांपैकी सुमारे ३५ लाख महिलांची आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नसल्याने त्या अपात्र ठरण्याची शक्यता असल्याची बाब अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावेळी शिंदे यांनी त्यासाठी अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले. सुमारे ३५ लाख अर्जदार महिलांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले नाहीत. या अर्जदारांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी, कोणताही अर्जदार योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. जिल्हास्तरीय बँकांची यासाठी मदत घ्यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे सक्त आदेश शिंदे यांनी दिल्याचे समजते.
३१ ऑगस्टनंतर आलेल्या अर्जदारांनाही योजनेचा लाभ देण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ साठी १ ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होईल. या योजनेतील अर्जाच्या छाननीसाठी सुधारित अॅप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही दिले आहेत. तसेच, स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले असून नवीन अॅप्लिकेशन वापरण्यास सहज सोपे आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वॉर्डस्तरीय, विधानसभानिहाय आकडेवारी उपलब्ध होईल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.