सातारा : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर ठाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर यांची नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहराचे उपआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. सुधाकर पठारे हे ठाणे शहराचे पोलीस उपआयुक्त म्हणून काम करत होते. त्यांची साता-याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. ते बुधवारी पदभार स्विकारणार आहेत.
साता-याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे हे 2011 सालचे आयपीएस आहेत. त्यांची 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले. आयपीएस होण्याअगोदरच ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर हे सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे प्राचार्या आहेत. आतापर्यंत त्यांनी उस्मानाबाद, पुणे ग्रामीण, सीआयडी पुणे येथे सेवा बजावली आहे.