पुणे : शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेची मुदत १५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. दरम्यान, ही मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरात स्व-वापराच्या मिळकतींना ४० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, २०१८ मध्ये ही सवलत रद्द केली. त्याचा फटका हा ९७ हजार ५०० मिळकतधारकांना बसला होता.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत १ एप्रिल २०१९ पासून नव्याने समाविष्ट झालेल्या मिळकतधारकांना ४० टक्के सवलत रद्द केली होती. त्यामुळे ही एक लाख ६७ हजार मिळकतधारकांना ४० टक्के सवलत मिळाली नाही, त्यावर राज्य सरकारने निवासी मिळकतींना ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. हा सर्व्हे सुरू असताना पीटी ३ चा अर्ज भरून घेतला जात आहे. हा फॉर्म भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही मुदत दोन दिवसांत संपणार आहे. यापुढे ही मुदत वाढवून देणार नसल्याचे मिळकतकर विभागाकडून कळविण्यात आले आहे.