पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती, परंतु आता पुणेकरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. झिका व्हायरसच्या रूग्णांची संख्या सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये झिका व्हायरसचा एकही रूग्ण आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरात झिकाची साखळी तुटताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब आहे. 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या शहरात रुग्णांची संख्या 75 असून, नवीन कोणत्याही प्रकारची रुग्णवाढ दिसुन आली नाही.
सततच्या पावसामुळे डासांचे प्रमाण जास्त..
गेल्या आठवड्यामध्ये पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला होता. पावसामुळे डासांचे प्रमाण वाढत गेले. याच दरम्यानच्या काळात रूग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढत होती. मात्र, आता पाऊस ओसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. झिका हा डासांमुळे इतरांना पसरणारा आजार असला तरी तो मुख्यतः गर्भवती महिलांच्या बाळांसाठी हानिकारक ठरतो. आतापर्यंत 75 पैकी 32 रुग्ण या गर्भवती महिला आहेत. एनआयव्हीच्या मते हा विषाणू एशियन असल्याने तो फारसा हानिकारक नाही. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण या रुग्णांना हृदयविकार आणि यकृताचे आजारही होते, तसेच त्यांची प्रकृती 68 ते 78 वर्षांच्या दरम्यान होती.
धोका कुणाला?
झिका व्हायरस हा मुख्यतः गर्भवती महिलांना प्रभावित करतो, झिका विषाणू गर्भावर परिणाम करू शकतो. या विषाणूमुळे गर्भाच्या मेंदूचा पूर्ण विकास होत नाही. तसेच, झिका व्हायरसमध्ये एक आरएनए जीनोम आढळतो, ज्यामुळे त्यात उत्परिवर्तन जमा करण्याची अधिक क्षमता असते. याशिवाय, बाळाच्या जन्माच्या वेळी देखील त्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. इतर काही लक्षणे दिसू शकतात ज्यामध्ये मेंदूच्या विकासाचा अभाव, खराब दृष्टी यावरतीही परिणाम होण्याची शक्यता त्यामध्ये असते.