बापू मुळीक
सासवड (पुणे): एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब मुख्य परिक्षा-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचे कौतुक होत ठिकठिकाणी सत्कार केले जात आहेत. परंतु, पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये एक तरुण पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण न होता ठिकठिकाणी सत्कार स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हा सर्वत्र आपण एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे सांगत फिरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक सासवड (ता. पुरंदर) नगरपालिकेच्या घंटागाडीवर कचरा संकलनाचे काम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली असल्याचे लोकांना सांगत आहे. तसेच तो आपल्या आजोळी इंदापूर येथील महाविद्यालयात कला शाखेची पदवी प्राप्त केली असून, त्याचे पितृछत्र हरपले आहे. आई व आजी यांच्या समवेत राहून खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. गेली वर्षभर तो सासवड नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील घंटा गाडीवर कचरा संकलन करण्याचे काम करत आहे, अशी माहिती देखील तो नागरिकांना देत आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळाल्याचे सांगितल्याने त्याचे अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत. तो बिनधास्तपणे हे सत्कार स्वीकारत आहेत.
सध्या राज्यात पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच आता आणखी २५० बोगस दिव्यांग अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी संघटनेने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. या २५० जणांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएसी) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच सादर केली जाणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन गैरप्रकार आढळल्यास कारवाई होणे अपेक्षित आहे. अशातच राज्यात कोणती परीक्षा उत्तीर्ण न होता आपण स्पर्धा परीक्षेत यश मिळवले असल्याचे अनेक उमेदवार सांगत असल्याचे समोर येत आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या काहीच दिवसांपूर्वी पुण्यात एका बनावट आयएएस अधिकारी महिलेने धुमाकूळ घातल्याचं उघडकीस आले आहे. या महिलेने खासगी सावकारी सुरू केली असून व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली आहे. या लोणी काळभोर परिसरात या बनावट आयएएस अधिकाऱ्याने अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सासवड येथील संबंधित युवक हा समाजाची मोठी दिशाभूल करत आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नावाचा देखील गैरवापर करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सासवड पोलीस आणि एमपीएससी या तरुणावर काही कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सदर तरुणाशी प्रतिक्रियेसाठी ‘पुणे प्राईम न्यूज’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद लागत आहे.