पुणे : खडकवासला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने मंगळवारी धरणाच्या सांडव्यावर तिरंग्याच्या रंगातील नेत्र दीपक असे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे खडकवासला धरण परिसर उजळून निघाला असून १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर विषयावर आधारित लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.
कधीपर्यंत लेझर शो सुरू राहील?
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुन्हाडे यांनी याबाबत माहिती देत असताना सांगितले की, ‘स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेसहा ते पावणेदहा वाजेपर्यंत लेझर शो सुरू होणार आहे. धरणालगतच्या पुलावरून हा लेझर शो पाहता येईल. तसेच धरण हे राष्ट्रीय जलसंपत्ती आहे. तिची ओळख व्हावी. यासाठी सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित स्वरूपात १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या भिंतीच्या परिसरात विद्यार्थ्यांना (पालकांच्या सोबत) शाळेचे ओळखपत्र पाहून सोडण्यात येणार आहे. ‘
केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगातील फुग्यांच्या कमानी..
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मागील वर्षी पासून धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई केली जात असून यावर्षी सुद्धा स्थिर रोषणाईसह आकाशात प्रकाशाचे धवल रंगाचे प्रकाशझोत टाकण्यात आलेले आहेत. केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगातील फुग्यांच्या कमानी करण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणाच्या कालव्यातून १००५ क्युसेक विसर्ग..
दरम्यान, आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या कालव्यातून १००५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. या धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १.७७ टीएमसी म्हणजे ८९.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून पानशेत धरणात धरणात १०.५१ टीएमसी म्हणजे ९८.६७ टक्के पाणीसाठा आहे.