मुंबई : मैत्रीनंतर लग्नाची मागणी घालत तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार भायखळ्यात घडला. याप्रकरणी सोहेल खान (२१) नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
गिरगावमधील रहिवासी असलेली २० वर्षीय तक्रारदार तरुणी खासगी नोकरी करते. २०२० साली नागपाडा येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिच्याच वर्गात शिकत असलेल्या सोहेल नावाच्या तरुणासोबत तिची मैत्री झाली. १२ वी पूर्ण झाल्यानंतर तरुणीने पेडर रोड येथील कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सोहेल तिला या कॉलेजमध्ये भेटायला येऊ लागला.
गेल्या वर्षी सोहेलने तिला प्रपोज केले. सोहेल आवडत असल्याने तरुणीने त्याला होकार दिला. जुलै महिन्यात दोघांनीही प्रेमसंबंधाबाबत त्यांच्या घरी सांगितले. पुढच्याच महिन्यात सोहेलच्या आईने तरुणीच्या कुटुंबीयांसोबत लग्नाबाबत चर्चा करून सोहेलच्या कुंटुंबीयांची विवाहाला संमती असल्याचे सांगितले. तरुणीने तिच्या वडिलांची प्रकृती ठीक झाल्यानंतर विवाह करू असे सोहेलला सांगितले होते.
विवाह ठरल्याचे सांगत सोहेल तरुणीकडे शारीरिक संबंधांची मागणी करू लागला. तरुणीने विवाह झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवू असे स्पष्ट केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये सोहेलने तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने भायखळ्यातील एका हॉटेलमध्ये नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र तरुणीने त्याला भेटायला नकार देण्यास सुरुवात केली.
सोहेल तिला लग्न मोडण्याची धमकी देऊ लागला. तरुणी भेटायला येत नसल्याने सोहेल तिला धमकावून अश्लील फोटो काढून पाठवण्यास सांगत होता. हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सोहेल तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी करू लागला. सोहेलच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.