पुणे : अनेक दशकांपासून आंबेडकरी गीतांपासून भक्ति गीतांपर्यंत शिंदे कुटुंबाचा गायनाच्या क्षेत्रात दबदबा आहे. आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा पुढे नेणारे आंनद शिंदे यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लोकप्रिय गायक व बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदेने एक पोस्ट शेअर करून दिनकर शिंदे यांच्या निधनाबद्दल माहिती दिली.
उत्कर्ष शिंदे याने आपल्या काकांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला असल्याचे उत्कर्षने म्हटले.
गायक दिनकर शिंदे यांनी आंबेडकरी गीतांसह माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दिनकर शिंदे यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांना त्यांच्या युट्युब चॅनेलवर लाखांच्या घरात व्ह्यूज आहेत. शिंदे घराण्यातील गायकाच्या निधनाने संपूर्ण शिंदे कुटूंबावर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.