साळवण (कोल्हापूर): गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील जंगलात सांबराची शिकार करून त्याचे शिरच्छेद करताना तिघांना वन विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघे फरार बंदूक व शस्त्रासह सोमवारी सकाळी वन विभागाच्या कार्यालयात हजर झाले. रविवार दुपारी तीनच्या सुमारास निवडे गावातील पाच जणांनी तिसंगी येथील वन क्षेत्राच्या हद्दीतील मीटर माळ येथे मादी जातीच्या सांबराची शिकार केली. सांबराचे शिरच्छेदन करताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले.
या पाच शिकाऱ्यांपैकी दोघे बंदूक व शस्त्रासह पसार झाले होते. त्यापैकी एकजण रविवारी रात्री उशिरा व दुसरा सोमवारी सकाळी वन विभागाच्या कार्यालयात हजर झाला. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सुभाष बापू पाटील (वय ४५), विठ्ठल कोंडिबा पाटील (वय ४०), जालिंदर कृष्णात पाटील (वय ३०), पांडुरंग बाबू पाटील (वय ५१), संजय लहू पाटील (वय ४४) सर्वजण (रा. निवडे, ता. गगनबावडा) येथील आहेत. या पाच जणांवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले.
ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायव वनसंरक्षक कमलेश पाटील, गगनबावड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका भवार वनपाल संभाजी चरापले, वनरक्षव ओंकार भोसले, नितीन शिंदे, प्रकाश खाडे, वनमजूर धोंडिराम नाकाडे, दाव पाटील, मुबारक नाकाडे, नाथा कांबळ अधिक तपास करत आहेत.