लोणी काळभोर : डोळ्यांत तेल घालून भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या पोलादी मनगटाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी अतिशय कलात्मक 1500 राख्या बनवल्या आहेत. आणि या राख्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या बर्फाळ प्रदेशासह संपूर्ण देशाच्या सीमेची रक्षा करणाऱ्या सैनिकांकडे पाठवण्यात आल्या आहेत.
लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत भारतीय सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता.13) करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स महेंद्र लावंडे, माजी सैनिक व शाळेचा माजी विद्यार्थी मनोज मानमोडे (कोर ऑफ सिग्नल), विलास महानवर, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, सुधाकर ओहोळ, सतीश कदम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थिनींनी मागील आठ-दहा दिवसांपासून लोकरीसह अन्य विविध वस्तूंचा उपयोग करत राख्या तयार केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या अंगभूत कलागुणांना वाव देत नवनिर्मितीची संधी प्राप्त करून देण्यात आली. राख्या तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, साधनांची उपलब्धता शाळेने करून दिली होती. प्रथम ध्वजाच्या प्रतिकृतीला राखी बांधण्यात आली. त्यानंतर या राख्या त्यांनी भारतीय जवानांसाठी पोस्टाद्वारे पाठवल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी देशाच्या सैनिकांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
यावेळी बोलताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर म्हणाल्या की, भारतीय सैनिक हे सर्व सुखांचा त्याग करून देश सेवेसाठी सदैव तत्पर असतात. रक्षाबंधनाच्या सणालाही ते सीमेवर कर्तव्य बजावीत असतात. त्यामुळे त्यांनाही रक्षाबंधनाच्या सणाची उणीव भासू नये. यासाठी दरवर्षी विद्यार्थीनी सैनिक भावंडांसाठी मोठ्या संख्येने राख्या पाठवीत असतात. भारतीय सैन्य दलातील जवानांना आम्ही पाठवलेल्या राख्या मिळाल्यानंतर, त्यांच्याकडून जे संदेश येतात, त्यामुळे आम्ही भारावून जातो. आमच्या शाळेतील मुलींना काहीतरी वेगळे केल्याचे व कृतार्थ झाल्याचे समाधान वाटते, असे बोरकर यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशालेतील शिक्षकांनी संवाद साधत राख्या बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना करून दाखवले. या प्रात्यक्षिकांच्या आधारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 1500 व त्यापेक्षा जास्त राख्या तयार केल्या आहेत. आणि या राख्या एका बॉक्समध्ये भरून आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स महेंद्र लावंडे व मनोज मानमोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. या राख्यांची तपासणी होऊन लवकरच सीमेवरील जवानांसाठी रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले तर आभार सुधाकर ओहोळ यांनी मानले.