जळगाव : जळगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील तळगाव गावाजवळ भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. या घटनेनंतर संबंधित गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्ताला असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांना आपला दौरा सोडून संबंधित गावात जावं लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगांव तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील तळगाव गावाजवळ भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं आहे. या अपघातात पाच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. गावातील संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड करत कंटेनर पेटवून दिला आहे. तसेच संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव-नांदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पण पाच वर्षीय चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आह. तळेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, तळेगावात घटनेनंतर आता पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बंदोबस्ताला असताना, त्यांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून तळेगावमध्ये दाखल व्हावे लागले आहे.