सांगली : येथील विठ्ठलवाडी फाटकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रेल्वे गेटला जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली. तेवढ्याच समोरुन रेल्वे आली. बसमध्ये सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली. पण, या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली होती.
ही घटना मंगळवारी (दि.13) सकाळी सांगलीतील पलूसमधील विठ्ठलवाडी रेल्वेगेटवर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूलबसच्या चालकाचा गाडी चालवताना अचानक ताबा सुटला होता. त्यामुळे बस रेल्वे गेटला जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली. तितक्यात त्याचवेळी या ठिकाणाहून जाणारी डेमो देखील काही अंतरावर तेथे दाखल झाली. पण, गेटमन आणि नागरिकांनी ती गाडी तात्काळ थांबवली. त्यामुळे दुर्घटना टळली. यावेळी दुसऱ्या ट्रॅकवरुन रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. रुळावर अडकलेली स्कूलबस नागरिकांनी मिळून हटवत रेल्वे रूळ मार्ग मोकळा केला. मात्र, या घटनेमुळे विठ्ठलवाडी-आमणापूर मार्गावरील वाहतूक सुमारे एक तासभर ठप्प झाली होती.
या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना थोडक्यात टळली आहे. नागरिकांनी ढकलत ढकलत स्कूलबस रेल्वे रूळावरून हटवली. दरम्यान, घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.