मुंबई : बार गायिकेवर जडलेले प्रेम एका उच्च शिक्षित तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. बार गायिकेने या तरुणाचा घरी राहिलेला लॅपटॉप परत करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे १० लाखांची मागणी केली आहे. या प्रकरणी बार गायिकेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून चेंबूर पोलीस तपास करत आहेत.
मूळचा जळगावमधील रहिवासी असलेला २५ वर्षीय किरण हा बोरिवलीतील सिद्धार्थनगरमध्ये वास्तव्यास असून, तो एका आयटी कंपनीत नोकरी करतो. त्याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ महिन्यांपूर्वी तो मित्रासोबत नवी मुंबईतील एका बारमध्ये पार्टीसाठी गेला होता. येथे त्याची ओळख बारमधील २२ वर्षीय गायिका विशाखासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. किरणने विशाखाला लग्नाची मागणी घातली. मात्र, ती लग्न करण्यास नकार देत होती. एप्रिल महिन्यात किरण हा विशाखाच्या चेंबूरमधील घरी गेला असताना त्याचा लॅपटॉप तेथेच राहिला. त्यानंतर विशाखा आणि तिच्या बहिणीने मोबाईल बंद केला. किरण तिच्या घरी गेला असता, घरसुद्धा बंद असल्याचे त्याला दिसले.
किरणने विशाखाच्या नागपूरमधील नातेवाईकाच्या घरी जाऊन तिचा शोध घेतला. पण, ती सापडली नाही. अखेर, त्याने विशाखाचे मूळगाव असलेल्या मध्य प्रदेशमधील ग्वालीयर जिल्ह्यातील बदनापुरा गाठले. पण, तिच्या गावात पोलीसही जाण्यास तयार नव्हते. अखेर, किरणने तिच्या विरोधात तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि तो मुंबईला परतला.
मुंबईत येऊन तो चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना विशाखाने त्याला कॉल करत लॅपटॉप परत करण्याचे आश्वासन देत तक्रार न करण्यास सांगितले. तिच्यावर विश्वास ठेऊन किरणने तक्रार केली नाही. त्यानंतर मात्र ती लॅपटॉप परत करण्यास टाळाटाळ करू लागली. काही दिवसांनी विशाखाच्या वडिलांनी किरणला कॉल करत लॅपटॉपच्या बदल्यात १० लाखांची मागणी केली. अखेर, किरणने चेंबूर पोलीस ठाण्यात जात विशाखा आणि तिच्या वडिलांविरोधात तक्रार दिली आहे.