पुणे : पुण्यात चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिस कोठडीदरम्यान अचानक चक्कर आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सचिन अशोक गायकवाड (वय-४७) असे पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गायकवाड आणि मनोहर रमेश माने ( वय-३६) या दोन्ही संशयित आरोपींना पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना ७ तारखेला रात्री नऊ वाजता अटक करून त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यात दोघांची पोलिस कोठडी घेण्यासाठी त्यांना ८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अशोक गायकवाड हा विश्रामबाग येथील पोलिस कोठडीत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्याला तात्काळ पोलिसांनी ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्राथमिक तपासात त्याला सेरेब्रल हॅमरेज (मेंदूमध्ये रक्तस्राव होणे) झाल्याचे समजले.
त्यानंतर त्याच्यावर शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर तत्पूर्वी शनिवारी त्याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयाने गायकवाड याची न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती.