उरण : उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दाऊद शेखच्या मुसक्याही आवळल्या. कर्नाटकातून त्याला अटक करण्यात आली. अशातच या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांना हाती लागला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाला गती मिळेल असे दिसुन येत आहे.
यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झालेला होता. अखेर हा गहाळ मोबाईल आता पोलीसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा पोलीसांना मिळालेला आहे. दरम्यान, मागील पाच वर्षापासून आमच्यामध्ये मोबाईलवरुन संपर्क होत होता, अशी कबुली आरोपी दाऊद शेखने अटकेनंतर दिली होती.
यशश्री शिंदेची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला गुलबर्गा येथे मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. चौकशीत त्यांने अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासेही केले. दाऊदला अटक केल्यानंतर त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी (उद्या) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यशश्रीचा मोबाईल हाती लागल्याने अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. या मोबाईलमधून यशश्री आणि दाऊदचे चॅटवरील संभाषण किंवा त्यासंदर्भातील पुरावे मिळू शकतात.