भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून बापानं पोटच्या लेकरांवर कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या रोंघा गावात आज (दि. 10) दुपारच्या सुमारास घडली आहे. एकनाथ ठाकरे (वय-40 वर्ष) असं हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तर धनराज ठाकरे (वय-70) असं हत्या करणाऱ्या संशयित आरोपी बापाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा येथे संशयित आरोपी धनराज यांचं टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तसेच लहान मुलगा हा मुंबईमध्ये नोकरीस आहे. मागील काही दिवसांपासून बाप- लेकांमध्ये संपत्तीचा वाद होता. आज 10 ऑगस्ट रोजी दुपारी पुन्हा एकदा याच वादातून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला कि, वडिलांनी रागातून कुऱ्हाडीने मुलाच्या मानेवर वार करुन निर्घृण हत्या केली.
काही क्षणात मुलगा एकनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. या घटनेची माहिती गावकर्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. तर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.