लोणी काळभोर (पुणे) : पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत धावत्या आरामदायी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बसमधील 17 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.
शुक्रवारी (ता. 09) सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इलेवन हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली आहे. चालत्या बसला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर बसमधून प्रवास करणारे सर्वजण बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस. बी. कंपनीची खाजगी आरामदायी बस हैद्राबाद या ठिकाणावरून पुण्याच्या बाजूला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निघाली होती. सोलापूरच्या आसपास आल्यानंतर काही प्रवाशांनी बसमधून काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याची माहिती चालकाला दिली होती. तरीही चालकाने गाडी तशीच पुण्याच्या बाजूने आणली. कदमवाकवस्ती हद्दीत आली असता गाडीच्या उजव्या बाजूचा टायर घर्षणाने फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघाला.
सकाळची वेळ असल्याने बसमधील सर्व प्रवासी जागे होते. त्यामुळे ते गोंधळ करू लागले. यावेळी चालकाने गाडी बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी उतरत असतानाच टायरने पेट घेतला. आग भडकल्याने बसच्या पुढील बाजूने पेट घेतला. यावेळी मोठा आगीचा डोंब उसळला. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस अंमलदार संतोष होले, बालाजी बांगर, ईश्वर भगत, तेलंग, रामदास मेमाणे, केतन धेंडे, कर्डिले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलास माहिती दिली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक खांदे, पोलीस हवालदार उमेश ढाकणे, योगेश काकडे, विवेक जगाताप, विकास ओव्हाळ यांनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, यावेळी वाहतूक कोंडीतून मार्ग काढीत अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनावणे, ड्रायव्हर नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड आणि पीएमआरडीचे वाहन चालक संदिप शेळके फायरमन लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार, घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आरामदायी बसचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि लोणी काळभोर वाहतूक विभाग यांनी वाहतूक सुरळीत केली.
एचपी कंपनीच्या अग्निशमन दलाची गाडी चालक नसल्याने बंद..
पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या एचपी कंपनीत अग्निशमन दलाची गाडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद स्वरुपात आहे. भविष्यात कंपनीच्या परिसरात मोठी आग लागल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ चालक नसल्याने गाडी बंद असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. त्यामुळे एचपी कंपनीला अग्निशमन दलाची गाडी असून नसल्यासारखी म्हणणे वावगे ठरणार नाही.
वाहनांच्या 5 ते 7 किलोमीटर रांगा..
बस पेटल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच बसमधील डिझेलची टाकी फुटेल, या भीतीने पुणे व सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. यावेळी लोणी काळभोर गाव व शेवाळेवाडीपर्यत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सदरची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बघ्यांची गर्दी..
बसला आग लागल्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अतिउत्साही नागरिकांनी व तरुणांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
View this post on Instagram