बीड : अपहरणाचा २०२३ मध्ये दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी कट रचून फिर्यादीसह त्याच्या भावाचा पाठलाग केला. मंगळवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास शहरातील एका धार्मिक स्थळात ते दोघे लपलेले असताना तलवारीने त्यांचावर प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर थार गाडीतून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी नेकनूर पोलिसांना माहिती दिली. नेकनूर पोलीसांनी पाठलाग करुन पळून जात असलेल्या आरोपींना थार गाडीसह ताब्यात घेतले.
याबाबत शकील निजाम शेख (रा.इस्लामपूर, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ शेख जमील शेख निजाम याचे सन २०२३ मध्ये सफवान खान महेबुब खान याने नातेवाईकांच्या मदतीने पैशासाठी अपहरण केले होते. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी मध्यस्थींच्या मदतीने सतत धमक्या दिल्या जात आहेत. याच गुन्ह्याचा जबाब असल्याने ६ ऑगस्ट रोजी शेख जमील शेख निजाम व शेख शबीर शेख निजाम हे न्यायालयात गेले होते. यावेळी बुंदेलपुरा परिसरात आरोपी थार गाडीतून हातातील तलवार, खंजर, लाकडी दांडा, विटा, स्टीलचा रॉड घेवून धार्मिक स्थळी घुसले. त्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात सफवान खान महेबुबखान पठाण (रा.भालदारपुरा पेठ बीड), अमनखान नासेरखान पठाण (रा.खंडकपुरा, पेठ बीड), शेख सफीक शेख खादर), शेख मुजम्मील शेख जावेद, शेख तसवर शेख वाहेद (सर्व रा. दाऊपुरा पेठ बीड), महमंद तालीम जाकीर आली (रा.भालदारपुरा पेठ बीड), अन्सार खान खाजा खान), महेबुब खान खाजाखान पठाण (दोन्ही रा. भालदारपुरा पेठ बीड), समीर खान करीम खान, शान खॉन समीर खान (दोन्ही रा.जुना बाजार, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा आरोपींना नेकनूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.